कोल्हापूर: कोरोनामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांत (Engineering colleges)प्रत्यक्ष अध्यापन बंद आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सुविधांचा वापर होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शुल्क कमी करण्याबाबत विचार सुरू आहे. शुल्क निश्चित करणाऱ्या समितीबरोबर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय (uday samant)सामंत यांनी केले. आज त्यांनी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘सकाळ’चे संचालक संपादक श्रीराम पवार (Director Editor Shriram Pawar)यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी निवासी संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते
अभियांत्रिकी शुल्क, प्रवेश याबाबत सामंत म्हणाले, ‘‘अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रत्यक्ष अध्यापन बंद आहे. महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा विद्यार्थ्यांना उपयोग होत नाही. अशा वेळी शैक्षणिक शुल्क वगळता अन्य शुल्क घेऊ नये. अभियांत्रिकी शुल्क निश्चित करण्यासाठी उच्च न्यायालय निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त समिती असते. अजून निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक व्हायची आहे. ही समिती अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. कोरोनामुळे अध्ययन आणि अध्यापन यामध्ये बदल झाले आहेत. अध्यापनामध्ये शिक्षक, विद्यार्थी संवाद होणे आवश्यक आहे. हे ओळखून चंद्रपूर, गडचिरोली यांसारख्या दुर्गम भागात ‘सॅटेलाइट स्टुडिओ’चा यशस्वी प्रयोग केला. आता संपूर्ण राज्यात या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांबाबत संवर्गचा निर्णय करून ४५ टक्के जागा भरण्याचे नियोजन आहे.’’ पर्यटन विकासाबद्दल सामंत म्हणाले, ‘‘रत्नागिरीतील गणपतीपुळे व परिसरासाठी ११० कोटीचा निधी दिला आहे. यातून पर्यटनपूरक विकामसकामे केली आहेत. त्यामुळे कोरोना परिस्थिती वगळता रत्नागिरीमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे. कोल्हापुरात पर्यटक येतात मात्र कोकणात येणारे मार्ग वाढल्याने त्यांचा कोल्हापुरात मुक्काम होत नाही. अनेक जण परस्पर गोव्याकडे जातात. हा मुक्काम झाला तर कोल्हापुरातही पर्यटन विकास होईल.’’ या वेळी गोकुळचे संचालक अजित नरके, मुख्य बातमीदार निवास चौगले उपस्थित होते.
Post a Comment